उलगुलान!

उलगुलान!
July 23, 2019 No Comments Interview,Paromita Goswami,social work Paromita Goswami

सात महिन्यांपूर्वी रक्ताळलेले पाय घेऊन मुंबईत आलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या मागण्यांची महाराष्ट्र सरकारने पूर्तता केली नाही, त्यामुळे पुन्हा या शेतकऱ्यांना मुंबईत धडक द्यावी लागली. अर्थात सरकार नावाची यंत्रणा कोणतीही गोष्ट जाणीवपूर्वक करीत असते. सात महिन्यांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची त्यावेळीच पूर्तता केली असती तर या शेतकरी बाया-बापड्यांना पुन्हा मुंबईत यावे लागले नसते. आणि ते पुन्हा मुंबईत आले नसते तर राजधानीतल्या लोकांना त्यांच्या दु:खांची, व्यथा-वेदनांची नीट ओळख कशी झाली असती? वृत्तवाहिन्यांवरूनही नेहमीचे तेच ते यशवंत गुणवंत दाखवून, दाखवणारे आणि पाहणारेही कंटाळलेले असतात, तिथे जरा नवे चेहरे दाखवण्याची संधी त्यानिमित्ताने मिळते. छायाचित्रकारांना रापलेल्या चेहऱ्यांचे क्लोजअप्स मिळतात. अशा अनेक गोष्टींचा विचार करूनच सरकारने मागच्या आश्वासनांचे कागद हलवले नव्हते. आता सरकारी यंत्रणा पुन्हा अभ्यास करेल आणि राजधानीतल्या लोकांना आदिवासी, शेतकऱ्यांची तोंडओळख तरी झाली आहे किंवा नाही याचा विचार करून पुढील निर्णय घेईल. आणि तसेही निर्णय घेण्याची घाई करण्याचे कारण नाही. विरोधी पक्षांचा दबाव वगैरे घेण्याची तर आवश्यकताच नाही. पंतप्रधानांच्या भाषेतच बोलायचे तर काँग्रेसने सत्तर वर्षांत जे प्रश्न सोडवले नाहीत, ते साडेचार वर्षांत सोडवण्याची घाई कशाला? म्हणून मग आश्वासनांची पाने तोंडाला पुसून त्यांना त्यांच्या गावाकडे परत पाठवून देण्याची सरकारला घाई असते. नाहीतर मग राजधानीतल्या वाहतुकीला अडथळा होऊन त्यांचा खोळंबा होतो. त्यांना ऑफिसला वेळेवर पोहोचता येत नाही. लेटमार्क पडतो. संध्याकाळी घरी पोहोचायला उशीर होतो आणि टीव्हीवरच्या मालिका पाहता येत नाहीत. त्याची फार काळजी घेतली नाही, तर सोशल मीडियावरून सरकारला धारेवर धरले जाते. सरकारच्या प्रतिमेला धक्का बसतो. आदिवासींचे हक्क त्यांना वर्षानुवर्षे मिळालेले नाहीत, ते त्यांना लगेच मिळाले पाहिजेत असे काही नाही. त्यांचीही तशी अपेक्षा नसावी. त्यांना लेखी कागद हवा असतो, तो दिला की ते समाधानाने परत निघतात.
वनजमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर करा, वनपट्टेधारकांना दुष्काळी मदत आणि पीककर्ज द्या, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा, दुष्काळग्रस्तांना दोन किलो दराने धान्य द्या, २००१ पूर्वी गायरान जमीन कसत असलेल्या शेतकऱ्यांना जमिनीची मालकी द्या अशा मागण्या घेऊन अठरा जिल्ह्यांतील बायाबापडे उलगुलान मोर्चा घेऊन आले. कवितेमुळे ‘उलगुलान’ हा शब्द परिचयाचा आहे. त्याचा अर्थ विद्रोह किंवा महाविद्रोह. वर्षानुवर्षे परंपरेच्या वरवंट्याखाली पिचलेल्या आणि जगण्याची लढाई दिवसेंदिवस कठीण होत चाललेल्या आदिवासींपुढे उलगुलान करण्यावाचून पर्याय नाही. जगण्यासाठी किमानातल्या किमान सुविधांसाठी हे लोक लढत असतात, त्यांच्या आवाजाचा त्रास होऊ लागला की त्यांना नक्षलवादी ठरवून मोकळे होणाऱ्यांची कमतरता नाही. किंबहुना देशप्रेमी सरकारविरोधात अराजक माजवण्याच्या नक्षलवाद्यांच्या कटाचा हा एक भाग असल्याच्या चर्चा देशभक्तांच्या व्हाट्सअप ग्रूप्सवर रंगत असतात. फरक एवढाच, की अजूनही या माणसांनी लोकशाहीची वाट सोडलेली नाही. कुठल्याही पक्षाचे असले तरी सरकार या यंत्रणेवरचा विश्वास ढळू दिलेला नाही, म्हणूनच ते पुन्हा पुन्हा सरकारच्या दरवाजावर धडका मारतात. डोकी रक्तबंबाळ होईपर्यंत ते धडका देत राहतील, परंतु एका टप्प्यावर त्यांच्या संयमाचा बांध फुटला तर त्यांना दोष देता येणार नाही. दुसऱ्यांदा राजधानीत धडक देताना मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार त्यांनी केला. ठाण्यातून पायी निघून दोन दिवसांची पायपीट करून मुंबईत दाखल झालेल्या लोकांनी शेतीची अन् जगण्याची काय दशा झाली आहे, याचे विदारक वास्तव सरकारपुढे मांडले. कोणत्याही आंदोलनाचा प्रभाव त्याच्या नेतृत्वावर अवलंबून असतो. प्रतिभा शिंदे, पारोमिता गोस्वामी यांच्यासारखे लढवय्ये तरीही संयमी नेतृत्व या लाभल्यामुळे मोर्च्याला एक शिस्त होती. प्रचंड संख्या असूनसुद्धा त्यात कर्कश्शपणा नव्हता. त्यांच्या शिस्त आणि संयमाची सरकारने परीक्षा पाहू नये. नेत्याला अटक झाली म्हणून टायर जाळणारी किंवा कुणीतरी कुठेतरी मूर्तीची विटंबना केली म्हणून शेकडो मैलावर लोकांना वेठीला धरणारी ही धंदेवाईक माणसे नाहीत. जगण्याच्या लढाईत खरोखर पिचलेली, तरीही जिद्द न हरता परिस्थितीशी दोन हात करणारी ही इथली आदिवासी माणसे आहेत. आश्वासनांचा कागद घेऊन त्यांनी पुन्हा राजधानीत येऊ नये, तो उलगुलान सरकारला झेपणार नाही!

Tags
About
Paromita Goswami Paromita Goswami founder, President, Shramik Elgar, mass organisation of unorganized sector, farmers and labourers in Vidarbha

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *