पारोमिता, भालो आशे! 

 पारोमिता, भालो आशे! 
July 23, 2019 No Comments Biography,Paromita Goswami,social work Paromita Goswami
भाषा आणि प्रांतांच्या अस्मिता ओलांडून हेतूपूर्वक स्वत:ला एखाद्या क्षेत्रात झोकून देणं सोपं नाही. त्यातही खात्यापित्या घरातली, सुखात लोळू शकणारी मुलगी जंगलखोऱ्यांत आव्हानात्मक प्रश्नांना सामोरं जाण्याचा निर्णय स्वत:हून घेते आणि तो ताकदीनं निभावूनही नेते, तेव्हा कौतुकापेक्षा आदरच अधिक वाटू लागतो.

पारोमिता गोस्वामी हिच्याबद्दलही हीच भावना मनात येऊ शकते. अभ्यासू नगररचनातज्ज्ञ आणि समपिर्त समाजवादी कार्यकर्ते प. बा. तथा बाबुराव सामंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा दुसरा संघर्ष पुरस्कार मिळाला. रचनात्मक संघर्षाद्वारे बहुजनांचं आयुष्य सुखकर बनवता येतं यावर बाबुरावांचा पूर्ण विश्वास होता.

केवळ रचना, केवळ संघर्ष, केवळ अभ्यास किंवा केवळ परिश्ाम हे निराशेकडे आणि पराभवाकडे जाणारे मार्ग आहेत; पण त्या सर्वांची योग्य सांगड घातली तर असंख्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हसू आणणारा हमरस्ता पायाखाली येतो हे नागरी निवारा परिषदेच्या माध्यमातून बाबुरावांनी मांडलेलं गणित त्यांच्याकडं कधीही शिकवणी न लावलेल्या पारोमिताला चांगलंच अवगत आहे. कोलकात्यातली ही मुलगी शिकली समाजकार्य महाविद्यालयांत; पण रमली आदिवासी व सर्वसामान्य माणसाच्या हक्कांच्या लढ्यांमध्ये. १९९०च्या दशकात श्रमजीवी संघटनेबरोबर तिनं पूर्णवेळ काम केलं.

वेठबिगार, मजूर यांच्या रोजगार, शिक्षण आणि राजकीय अधिकारांचा पाठपुरावा करत असतानाच चंदपूरमधील चिन्ना मट्टामी या आदिवासी तरुणाची नक्षलवादी समजून पोलिसांनी केलेली हत्या तिला हलवून गेली. चिन्नाची आई जब्बेबाई निर्धारानं लढली. या लढ्यात पारोमिता तिच्याबरोबर होती. यानंतर १९९९पासून तिनं चंदपूर जिल्हा हेच आपलं कार्यक्षेत्र मानलं. ‘श्ामिक एल्गार’ या संघटनेमार्फत तिनं आदिवासींच्या जमिनीच्या हक्कांचा लढा उभा केला. जमीन अधिकाराची अनेक प्रकरणं तिनं लावून धरली. हे करताना तिला जाणवलं की आदिवासींबरोबरच गावातील अल्पभूधारकांचे प्रश्ान् तितकेच तीव्र आहेत. तिच्या कामाचा परीघ रुंदावत गेला.

आज श्रमिक एल्गारचे १० हजार सभासद आहेत. पतपेढी, तेंदुपत्ता या व्यवहारांसाठी सहकारी संस्थांचं जाळं उभारलं गेलं आहे. साक्षरतेपासून विज्ञान प्रयोगशाळा, विशेष शिकवण्यांपर्यंत तसंच स्थानिक नेतृत्व क्षमतांपासून राजकीय लोकप्रतिनिधित्वापर्यंत प्रशिक्षण देणारे उपक्रम श्रमिक एल्गारतर्फे चालवले जातात. गावातल्या समस्या सोडवण्यासाठी ‘जाहीर पंचनामा’ बैठका लावल्या जातात. सध्या शेतीविकास फंडाच्या कल्पनेनं तिला पछाडलं आहे. चिटेगावसारख्या छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या पारोमिताचा आठवड्याला किमान ४०० कि.मी. प्रवास होतो यावरून तिच्या कामाचा झंझावात लक्षात यावा. साथ देणारा पती आणि चिमुकली रूचिकाही आता तिच्या सोबत आहेत. पारोमिता, भालो आशे!
Tags
About
Paromita Goswami Paromita Goswami founder, President, Shramik Elgar, mass organisation of unorganized sector, farmers and labourers in Vidarbha

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *