श्रमिक एल्गार

श्रमिक एल्गार
जन्म आणि नामकरण
१९९९ चा तो काळ. पावसाचे दिवस सुरू होते. महाराष्ट्रात निवडणुकीची धामधूम सुरु होती. आचारसंहिता लागली. अशातच सिंदेवाही तालुक्यातील चिटकी येथे आदिवासी समाजाच्या गावडे भावंडामध्ये शेतीच्या धुऱ्यावरून वाद -भांडण झाले. प्रकरण पोलिसांत गेले. गोपाळ गावडेला अटक करण्यात आली. ठाणेदार भलावी यांनी कठोर कारवाईची ताकीद दिली. गोपाळची बायको घाबरली होती. ढसाढसा रडत होती. पोलीस पाटलाच्या दारी गेली. पण काही फायदा झाला नाही. त्याला सोडविण्यासाठी त्याच्या बायकोला पाच हजारांची मागणी पोलिसांकडन करण्यात आली. इतके पैसे कुठून द्यायचे, प्रश्न होता. जणू आभाळच कोळसले होते. घरी पोरं डोळ्यात बापाच्या येण्याची प्रतीक्षा करीत बसले होते. गावक-यांनीही त्याला सोडविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, हाती निराशा आली. अशातच काहींनी राजकीय नेत्यांकडे जाऊन त्यांच्या घराच्या पायऱ्या झिजवल्या. तेव्हा छबिलभाई हे मोठेनेते होते. त्यांनीही आचारसंहिता असल्याने हात झटकले. गोपाळला चंद्रपूरच्या जेल डांबण्यात आले. निवडणूक आणि आचारसंहिता सुरु असल्याने गोपाळच्या सुटकेची आशा संपली होती.
याच काळात मूल तालुक्यातील बाबा वडलकोंडावार यांच्याकडे एक तरुणी आली होती. बाबांकडे मुंबईहुन चळवळीत काम करणारी एक तरूणी आल्याचे विजय सिद्धावार यांना कळले. ते प्रबोधन संस्था चालवीत असत. समाजकार्याची धडपड असल्याने त्यांनी त्या तरुणीची भेट घेतली. बाबांनी त्या तरुणीची ओळख करून दिली, ही “पारोमिता गोस्वामी”. मूळची बंगालची, मुंबईहून आली. पारोमिताला मदत करण्याची वडीलधारी सूचना केली. सिद्धावार यांनी नवभारत शाळेतील त्यांचे सहकारी शिक्षक अशोक येरमे यांना पारोमिताबद्दल सांगितले होते. आदिवासींचे काही प्रश्न असतील, तर सांग. पारोमिता मदत करू शकते, असे सांगितले होते. सामाजिक कामे करणारी कोणती तरी तरुणी मूलमध्ये आली आहे, याची खबर राजोलीच्या नवभारत शाळेतील गुरुदास येरमे यांनाही कळली. त्यातच गोपाळच्या अटकेचे वारे पंचक्रोशीत पसरले होते. गुरुदास येरमे यांनी शाळेतील फोनवरून पारोमिताशी संपर्क केला. गावातील घटनेची हकीगत सांगितली. अर्धा तासात माहिती घेऊन सांगतो, असे पलीकडून उत्तर आले. अशोक येरमे हे गोपाळच्या अटकेची कागदपत्रेच घेवून पारोमिताकडे गेला. ते वाचून धक्काच बसला. आचारासंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्याला अटक केल्याचे दाखविले होते. गोपाळच्या प्रकरणाचे निवडणूक उमेदवार किंवा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधही नव्हते. मात्र, त्यावर तहसीलदारांनीही डोळेझाकपणे सही केली होती. निवडणुकीच्या काळात गोपाळमुळे तर काही अनुचित घडले नव्हते, तरीही पोलिस प्रशासनाने अटक केली. तेव्हा पारोमिता युनिसेफमध्ये काम करीत होत्या. त्यांच्याकड़े कारागृह निरीक्षणाची जाबाबदारी होती. जेलमध्ये भेट दिली. त्या तेव्हाचे कलेक्टर के.बी. भोगे यांच्याकडे गेल्या. एका निर्दोष व्यक्तीवर चुकीचा गुन्हा नोंदविल्याची कैफीयत मांडली. त्यांनीही ते समजून घेतलं. पुढील दोन दिवसांतच गोपाळ जेलमधून सुटला. गावी गोपाळला घेऊन पारोमिता येणार असल्याची वार्ता पसरली. त्यांना गावापर्यंत आणण्यासाठी गुरुदास येरमे राजोलीच्या बसस्थानकावर दुपारी १२ वाजेपर्यंत आपली स्कुटर घेऊन वाट बघत होते. पण, पारोमिता आणि विजय सिद्धावार हे मूल बसने थेट सरडपार येथे उतरले. पुढे बस नसल्यामुळे चार किलोमीटर पायी जावं लागलं. दगड मातीचा रस्ता आणि भोवती घनदाट जंगल होतं. वस्तीत शिरत असताना फक्त झाडांची काहीशी सळसळ आणि पक्षांचा तितका आवाज कानी पडत होता.  काळजाचा ठोका चुकत होता अन तासाभरातच गवताच छपरं घातलेलं गाव दिसलं. हे गाव होते चिटकी. ३०- ४० घरांच्या गावात आदिवासी समाजासह कोहळी, धीवर, दलित आदी समाज. गावात एक तरुण मुलगी आणि मुलगा येत असल्याचे बघून गावकऱ्यांना कुतूहल निर्माण झालं होतं. ते नक्षलवादी तर नाही ना, असा कयास काहींनी लावला. गोपाळ परत आल्याचे बघून गावात आनंद पसरला होता. मनोहर येरमे यांच्या घराच्या व्हरांड्यात सभा बसली. ही कोण बंगाली मुलगी आपल्या गावात आली असे म्हणून अनेकजण येरमेच्या घरी गर्दी करीत होते. त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी आपल्या समश्या मांडल्या. पोलीस पाटील ऐकत नाही. तलाठी पैसा खातो, फारेस्टवाले त्रास देतात. पोलिसही पिळवणूक करतात. महिलांनीही आपल्या समस्या मांडल्या. त्यांचे हक्क, कायदा, देशाचे संविधान त्यांना पटेल त्या भाषेत पारोमिता समजावून सांगत होत्या. पण, या समस्या सोडविण्यासाठी एक संघटना काढायला हवी, असा सूर निघाला. गावातील बायकांनीही पाठिंबा दिला. परतीच्या वेळी संध्याकाळ झाली होती. त्यामुळे तिथेच मुक्काम केला. गावातील आदिवासी महिलांनी सादर केलेले गीत ऐकून पारोमिताच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. त्यांनी आदिवासी संस्कृतीची माहिती जाणून घेतली.
पुढे एक-दोन बैठकी झाल्या. चिटकीसह घोट, मुरपार, गोविंदपूर या गावातील लोक एकत्र आले. काहीजण गावोगावी फिरून संघटना स्थापन करण्यासाठी जनजागृती करीत होते. दलित, शोषित, पीडित, कामगारांचे प्रतिनिधीत्व करणारा “श्रमिक” शब्द संघटनेत ठेवण्याचे एकमत झाले. तर त्यापुढे एल्गार हा शब्द लावण्यात आला. एल्गार हा शब्द सुरेश भटांच्या गजलेतून घेण्यात आला. मुंबईत विवेक पंडीत यांच्यासोबत सामाजिक काम करीत असताना पारोमिता मराठी शिकल्या होत्या. त्या सुरेश भटांच्या चाहत्या झाल्या. साध्याच माणसांचा एल्गार आहे, थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही, याच गझलमधून एल्गार हे नाव संघटनेमध्ये लावण्यात आले. एका संघटनेच्या जन्मानंतर नामकरणही अशारितीने झाले.