सामाजिक जाणिवांतील मैत्र

सामाजिक जाणिवांतील मैत्र
April 14, 2019 No Comments life,Paromita Goswami Paromita Goswami

‘‘पारोमिता आणि माझी भेट अमेरिकेतल्या येल विद्यापीठात झाली. मी जेएनयूचा पीएच.डी.चा विद्यार्थी होतो. जेएनयू आणि येल विद्यापीठाच्या संयुक्त कार्यक्रमातून मला येलची फेलोशिप मिळाली. २००४-०६ या कालावधीत मी जो फॉक्स इंटरनॅशनल फेलोशिपवर येल विद्यापीठात होतो. २००५-०६च्या काळात पारोमिता ४ महिन्यांच्या येल वर्ल्ड प्रोग्रामअंतर्गत येल विद्यापीठात आली होती. दर वर्षी जगभरातल्या निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये उगवत्या नेत्यांना येल विद्यापीठातर्फे ही शिष्यवृत्ती देऊन आमंत्रण दिलं जातं. त्यांना वर्ल्ड फेलो म्हणतात. या फेलोंचे विद्यार्थ्यांशी चर्चेचे कार्यक्रम घेतले जात. अशाच कार्यक्रमामध्ये मी पारोमिताला भेटलो.’’ चंद्रपूरसारख्या अजूनही दुर्गम मानल्या जाणाऱ्या भागामध्ये गेल्या १७-१८ वर्षांपासून काम करणाऱ्या पारोमिता गोस्वामी यांचे पती, डॉ. कल्याण कुमार त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगत होते.

‘‘मला अजूनही आठवतं, ‘कॅन देअर बी युनिव्हर्सल अंडरस्टँडिंग ऑफ ह्य़ुमन राइट्स?’ असं त्या कार्यक्रमाचं शीर्षक होतं. पारोमिता भारत आणि मानवाधिकार याविषयी बोलणार होती. आम्ही दोघंही भारतीय होतो, स्वाभाविकच आमच्या संवादाला सुरुवात झाली. या कार्यक्रमानंतर आम्ही ई-मेलद्वारे संपर्कात राहिलो. सुरुवातीला एखादा मुद्दा, एखादा विषय यांच्यावर चर्चा, माहिती असं त्याचं स्वरूप होतं. हळूहळू आमच्या भेटी वाढायला लागल्या. आम्ही संध्याकाळी भेटायचो, रात्रीचं जेवण एकत्रच घेताना खूप गप्पा व्हायच्या. त्यामधून मला तिच्या कामाविषयी माहिती मिळत गेली. तिचं काम आणि माझा अभ्यास यामध्ये काही समान दुवे होते. ‘कामगार संघटनांचा इतिहास’ हा माझ्या पीएच.डी.चा विषय होता. त्यामध्ये झारखंडमधील खाण कामगारांच्या संघटनांचा १९२० ते १९७० असा माझ्या अभ्यासाचा आवाका होता. पारोमिता स्वत: ‘श्रमिक एल्गार’ नावाची कामगार संघटना चालवत होती. खरं तर त्यावेळी तिच्याशी बोलताना मला अशी शंका यायची की ‘श्रमिक एल्गार’ ही कामगार संघटना कमी आणि एनजीओ अधिक आहे. इतर एनजीओंपेक्षा थोडे जास्त सक्रिय असेल. त्यामधून फार काही क्रांतिकारी होत नाही, लोकांपर्यंत पुरेसे पोहोचत नाही असं मला वाटायचं. थोडक्यात सांगायचं तर माझा पुस्तकी विचार होता, तर तिचे विचार कामामधून अधिक विकसित झाले होते.’’

‘‘ती अनेकदा माझ्या सिद्धांतांना आव्हान द्यायची. ‘पुस्तकी मुद्दे आणि प्रत्यक्ष काम यामध्ये खूप फरक असतो. संघटना उभी करणं दिसतं तितकं सोपं नाही, एकेका माणसाला जोडत पुढे जावं लागतं,’ असं ती मला सांगायची. ‘तू स्वत: कामाला सुरुवात करशील तेव्हा हे सगळं किती कठीण आहे हे तुला कळेल’, असं ती म्हणायची. तिच्याशी अनेक विषयावर बोलणं व्हायचं. अमेरिकेतले प्रश्न, न्यू यॉर्क टाइम्समधल्या बातम्या, अमेरिकेतील सिव्हिल सोसायटी यांच्याबद्दलही आम्ही बोलायचो. हळूहळू आम्ही सकाळच्या ब्रेकफास्टलाही भेटू लागलो. इतक्या चर्चा, सहवासातून भावनिक जवळीक निर्माण होणं अगदी स्वाभाविक होतं.’’

प्रेमात पडायला लागण्याच्या या काळापासून लग्नापर्यंतचा प्रवास कसा झाला याबद्दल पारोमिता सांगतात, ‘‘मी २००६मध्ये परत आले, त्याच वर्षी कल्याणसुद्धा त्याचा अभ्यास संपवून परत आला. मी पुन्हा चंद्रपूरमध्ये संघटनेच्या कामाला लागले. कल्याण तीन मूर्ती भवनमध्ये नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीमध्ये फेलो म्हणून काम पाहू लागला. आमचा संपर्क कायम होता. मग आम्ही एकमेकांना भेटण्यासाठी जायला लागलो. त्यातून त्याचा माझ्या कामातील रस वाढत गेला. त्याच्या चंद्रपूरच्या फेऱ्या वाढायला लागल्या. आमचे काही कार्यकर्ते दिल्लीला गेले की कल्याण त्यांना मदत करायचा, विशेषत: कायदेशीर प्रकरणांमध्ये. अशा प्रकारे तो आमच्या कामात सहभागी व्हायला लागला. आमच्या भेटीगाठींमुळे माझं कामाकडे दुर्लक्ष होतंय असं कल्याणला वाटायचं. पण लग्न करायचं या निर्णयावर मी ठाम होते आणि २००८ मध्ये आम्ही लग्न केलं. आमच्या निर्णयाला माझ्या घरून काही विरोध झाला नाही. उलट मी लग्न करतेय याचा त्यांना आनंदच होता. कारण मी खूप आधी घर सोडलं होतं. १९९३-९५ या दोन वर्षांमध्ये मुंबईतल्या ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’मधून शिक्षण घेतलं. त्यानंतर ३-४ वर्षे मी ठाण्यात काम करत होते. त्यानंतर मी १९९९ पासून चंद्रपूरला कामाला सुरुवात केली. तेव्हापासून मी इथेच होते. कल्याणच्या घरी सुरुवातीला थोडासा विरोध होता, तो लवकरच मावळला. पण या विरोधाबद्दल त्याने मला कळू दिलं नाही. लग्न झाल्यानंतरच मला असा काही विरोध होता असं कळलं. मला कोणी जाणवूही दिलं नव्हतं. विरोधाची कारणं तशी साधीच होती, मी बंगाली, तर कल्याण बिहारी. आमच्या वयामध्ये फरक होता, मी त्याच्यापेक्षा मोठी होते. पण नंतर या गोष्टी महत्त्वाच्या राहिल्या नाहीत.’’

‘‘कल्याणमध्ये मला आवडण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या, त्याचं व्यक्तिमत्त्व, एखाद्या प्रश्नाची समज, आकलन, त्याचा धोरणात्मक विचार, एकाच प्रश्नाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची त्याची क्षमता असे अनेक गुण मला आवडायचे, अजूनही आवडतात. इतिहास, राजकीय अर्थव्यवस्था, भूगोल या विषयांमध्ये त्याचा सखोल अभ्यास आहे. कोणत्याही दोन घटनांमध्ये काही परस्परसंबंध आहे का हे त्याला शोधता येतं. एखाद्या प्रश्नावर भूमिका घेताना त्याच्या या गुणांचा खूप फायदा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे ‘श्रमिक एल्गार’च्या संघटनात्मक बांधणीवर त्याचं सतत लक्ष असतं. हे काम शास्त्रशुद्ध पद्धतीने झालं पाहिजे यावर त्याचा कटाक्ष असतो. आम्हा दोघांचीही कामाची कौशल्ये वेगवेगळी आहेत, पण ती एकमेकांना पूरक आहेत. अर्थात आमच्यामध्ये वादही होतात. अनेक मुद्दय़ांवरून मतभेद होतात, खटकेही उडतात, पण त्यामुळे आम्ही अधिक तीक्ष्ण, खोलात जाऊन काम करतो असं माझं निरीक्षण आहे. मतभेदाचं मूलभूत कारण म्हणजे आमच्या स्वभावात, विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आहे. मी खूप भावनिक आहे, एखादी घटना घडली की मी त्यावर लगेचच व्यक्त होते, प्रतिसाद देते. कल्याणचं तसं नाही. तो रॅशनल आहे. कोणत्या घटनेचा, प्रसंगाचा आपल्या कामाशी काय संबंध असेल, त्याचे काय परिणाम होतील याचा तो विचार करतो.’’ याचबद्दल कल्याण अधिक सांगतात, ‘‘अनकेदा ‘अ’ प्रश्न मोठा की ‘ब’ मोठा हे ठरवताना आमचे मतभेद असतात. कधीकधी एक प्रश्न मोठा दिसत असला तरी प्रत्यक्षात दुसऱ्या प्रश्नाचा अधिक लोकांवर परिणाम होत असतो. त्यामुळे आधी कोणती समस्या सोडवायची, कोणत्या प्रश्नाला हात घालायचा यावर आमचे मतभेद होतात. पण चर्चेतूनच त्यामधून मार्ग निघतो. मी पारोमिताबरोबर २००८-०९ पासून काम करायला सुरुवात केली. पण ती त्याआधी ८-९ र्वष संघटनेचं काम करत आहे. संघटनेचं काम राजकीय स्वरूपाचं असलं तरी निवडणुका लढवत नाही. पारोमिताला राजकीय महत्त्वाकांक्षा काही नाहीत. तिला फक्त दुसऱ्यांसाठी काम करायचं असतं. त्यातूनच ती अनेकदा भावनिक पद्धतीने विचार करते. अशा वेळी मी अधिक व्यवहारी भूमिका घेणं योग्य असतं.’’

दोघांच्याही सामाजिक जाणिवा तीव्र असल्यामुळे घरातही त्याबद्दल सातत्याने चर्चा होणं अगदी स्वाभाविक असतं. पण मुलीसमोर वाद घालायचे नाहीत असा अलिखित नियम आहे. त्याबद्दल पारोमिता सांगतात, ‘‘आमची मुलगी रुचिका साडेसात वर्षांची आहे. तिच्यासमोर आम्ही वाद घालत नाही. बाकी जोडप्यांमध्ये होतात तसे आमच्यातही वाद होतात. पण त्याचं स्वरूप गंभीर होऊ देत नाही. रुचिकासमोर आम्ही काही गंभीर वाद-चर्चा करतच नाही. आमच्या कामाचा त्रास या लहान मुलीला कशाला, असा आमचा विचार असतो. सकाळी कामं ठरवतानाच बाहेर कोण जाणार आणि मुलीसोबत कोण राहणार हे आम्ही ठरवून घेतो. तिला एकटीला घरात सोडून दोघेही बाहेर गेलो आहोत असं अगदी क्वचितच घडतं. अशा वेळी एखादा कार्यकर्ता तिच्याजवळ थांबतो, पण तशी वेळ येणार नाही यावर आमचा कटाक्ष असतो. माझी मुलगी ही माझी सर्वात मोठी जबाबदारी आहे, कारण ती मी स्वत:हून आनंदाने स्वीकारलेली आहे. ती लहान आहे, तिला माझी गरज आहे. दुसरं म्हणजे एक पिता म्हणून कल्याण अगदी उत्तम आहे. तो जितका चांगला माणूस आहे तितकाच चांगला पिता आहे. रुचिकाची जबाबदारी त्यानं अगदी आनंदानं स्वीकारली आहे, आणि तेही अगदी सहजतेनं. आपण काही विशेष करत आहोत असा त्याचा अजिबात आविर्भाव नसतो. त्याची मला आवडणारी ही आणखी एक गोष्ट.’’

सातत्याने राजकीय-सामाजिक भूमिका घेणे, चळवळी-आंदोलनांच्या मार्गातून प्रश्नांविरोधात आवाज उठवणे, अशी कामं करताना कधीकधी धोकाही पत्करावा लागतो. त्याबद्दल पारोमिता सांगतात, ‘‘आमच्या कामामध्ये धोका आहेच. २०१०-१५ या कालावधीत आम्ही दारूविरोधी अभियान राबवलं, २०१५मध्ये दारूबंदी लागू झाली. त्यामुळे काही दारूमाफिया आमच्या विरोधात गेले होते. खरं तर तेव्हा आम्हाला पोलिसांचा चांगला पाठिंबा मिळत होता. पण काही स्थानिक पोलीस आणि दारूमाफिया यांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. दारूबंदीनंतर २०१५-१६मध्ये चोरटय़ा दारूची आयात सुरू झाली. आमचे कार्यकर्ते ही चोरटी दारू पकडत असत. कधीकधी कल्याण त्यांच्यासोबत जात असे. तेव्हा कार्यकर्त्यांना मारहाण होणे, खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार सुरू झाले. अशाच खोटेपणातून कल्याण आणि इतर ६ कार्यकर्त्यांवर कलम ३०७ अंतर्गत खुनाचा प्रयत्न हा गुन्हा दाखल झाला होता, त्यावेळी काही काळ कल्याणला भूमिगत व्हावं लागलं होतं. जामीन मिळेपर्यंत तो भूमिगत होता. तेव्हा मला पहिल्यांदा असुरक्षित वाटलं, आम्हा दोघांसाठी नाही पण आमच्या मुलीसाठी. त्यानंतर मग आम्ही ठरवून आमच्या कामाची दिशा बदलली. कारण काम थांबवणं किंवा कामातून बाहेर पडणं हा काही उपाय नसतो, यामध्ये एकदा शिरलं की तुम्हाला पोळून निघावंच लागतं. आता दोन वर्षांमध्ये पुन्हा परिस्थिती बदलली आहे. खरं सांगायचं आमच्या कामासंबंधीच्या परिस्थितीमध्ये स्थिरता नसतेच, सतत बदल होत असतात. त्यामुळे आल्या परिस्थितीला तोंड देणे आणि तशी धोरणे आखणे हे सातत्याने करावे लागते. आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की, आमच्या कामामुळे आम्हाला खूप हितचिंतक मिळाले आहेत. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात असतो. त्यातून आम्हाला सुरक्षिततेची जाणीव होतेच, त्याशिवाय त्यांचं मार्गदर्शनही आम्हाला मिळतं. त्यामध्ये अगदी वरिष्ठ पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी, पत्रकार, प्राध्यापक, संघटनेचे मित्र यांचा समावेश आहे. आपल्या भोवतीच्या प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही ज्ञान असतं यावर आमचा विश्वास आहे, त्या सर्वाचा आम्ही आदर करतो. आम्ही एकटे असतो तर धोका वाढला असता, पण सुदैवानं झालं नाही. घराबाहेर मिळणाऱ्या या पाठिंब्याबरोबर घरातूनही आधार मिळत होता. कल्याणच्या आईने सुरुवातीपासून आम्हाला साथ दिली. दारूबंदीविरोधात लढा सुरू असताना जानेवारी २०१४ मध्ये मी ५-६ दिवस नागपूरच्या तुरुंगात होते, त्यावेळी माझ्या सासूबाईंनी आमच्या मुलीला आणि घराला सांभाळलं. माझी मुलगी फक्त साडेतीन वर्षांची होती, पण तिच्याजवळ तिची आजी असल्यामुळे मला तिची तशी चिंता करायची गरज पडली नाही.’’

अनेक वर्षांपासून चंद्रपूरमध्ये इतरांच्या कामामध्ये स्वत:चं आयुष्य खर्च केल्यानंतर आता त्यामध्ये स्वत:च्या मुलीसाठी आणि पतीसाठी थोडीशी जागा शोधण्याची पारोमिताची धडपड अजूनही सुरूच आहे. त्यामध्ये कल्याणसारख्या जोडीदाराची साथ असल्यामुळे ही धडपड सोपी आणि आनंदाची झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. बंगालमधली पारोमिता आणि बिहारचा कल्याण, दोघांची भेट झाली अमेरिकेत आणि आता एकत्र काम करतात चंद्रपूरमध्ये. अशी उदाहरणं पाहिली की प्रेमाला कसलं बंधन नसतं त्याप्रमाणेच सामाजिक कामालाही कसलं बंधन नसतं हे पटतं.

निमा पाटील

nima_patil@hotmail.com

Tags
About
Paromita Goswami Paromita Goswami founder, President, Shramik Elgar, mass organisation of unorganized sector, farmers and labourers in Vidarbha

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *