October 19, 2020
/
No Comments
/
blog,Interview,Paromita Goswami
सामाजिक कार्यकर्ता होणं इतकं सोप्प नाही. त्यासाठी टोकाची तपस्या करावी लागते. दुर्दम्य आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनत घेण्याची ताकत हवी. यशाला हूरळून आणि अपयशाला खचून न जाण्याचा गुण आत्मसात करावा. याही परिस्थितीत जो ताऊन सुलाखून निघतो, त्यालाच खरा सामाजिक कार्यकर्ता समजावं. काही वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या ऍड. पारोमिता गोस्वामी यांची मुलाखत घेतली. सामाजिक कार्यकर्ते बनतानाचा प्रवास कसा असतो हे जाणून घेण्यासारखे आहे.
तीही माणसंच होती
----------
चिन्ना मटानी. २००१ मध्ये नक्षलवादी ठरवून एका बनावट चमकीत त्याला ठार मारण्यात आले. यापूर्वीही असे अनेक प्रकार घडले होते. मात्र, अशिक्षित, उपेक्षित आणि बाहेरील स्वार्थी जगाकडून होणा-या पिळवणूकीमुळे या आदिवासींना दाद मागायची तरी कुठे हा प्रश्न होता. त्यामुळे बळी गेलेले अनेक आवाज न्यायालयापर्यंत पोहचलेच नाहीत. मात्र, ही वेळ वेगळी होती. एक माणूस म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता कुठलीतरी पारोमिता नावाची तरूणी धावून आली होती. आदिवासी नेमके काय असतात, ते नेमके कुठल्या स्थितीत राहतात, त्यांची बाजू न्यालालयाला कळावी हे गरजेचे होते. अन्यथा या प्रकरणात पकडलेल्या निर्दोष आदिवासींना नक्षलवादी ठरविल्या गेले असते. याकरिता या तरूणीने गडचिरोली सारखा दुर्गम जिल्हा पालथा घातला होता. नद्या, नाले, पहाड, दगड, धोंडे तुटवित आपल्या सोबतच टाईप रायटर घेऊन सहका-यांसह येथील अडीचशे आदिवासींचे शपथपत्र तिने गोळा केले होते. तर कोर्टाच्या सुट्या लागण्यापूर्वी हे प्रकरण नागपूर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात यावे याकरिता तिने अख्खी रात्री जागून काम पूर्ण केले होते. या चिकाटीच्या अव्याहत प्रयत्नांमुळेच त्याच दिवशी प्रकरण न्यायालयाच्या बोर्डावर येवू शकले.
पुढे सलग चार दिवस सुनवाई चाललेल्या या प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल जाहीर होणार होता. याची उत्सूकता सर्वांनाच होती. नागपूर येथील उच्च न्यायालयातील परिसरात सर्वत्र गर्दी जमली होती. याच गर्दीतून वाट काढत चिन्नाची आई जब्बेबाई आणि भाऊ पांडू आत येत होते. बाह्य जगाचा मागमूसही नसलेली जब्बेबाई हिचा अवतार पाहून अनेकांचे डोळे विस्फारत होते. एकविसाव्या शतकात असलेल्या जगात आजही इतके मागासलेले लोक असतात? हा त्या भावनेमागचा प्रश्न. मात्र, जे होते ते वास्तव होते. न्यायालयाने घेतलेली दखल, प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेला विषय यामुळे या प्रकरणाला एक महत्त्वपूर्ण वलय प्राप्त झालेले होते. जब्बेबाई न्यायालयात आली. संपूर्ण चेंबर भरगच्च भरलेलं, कुठेही जागा नव्हती. एवढ्यात एक वकील आपल्या जागेवरून अदबीने उभा झाला. शुभ्र पांढèया शर्टावर काळाभोर कोट चढविलेल्या त्या वकीलाने विनम्रतेने जब्बेबाईला आपल्या जागेवर बसायची विनंती केली. ती अडखळतपणे खुर्चीवर बसली आणि तेथील सर्वांच्या चेहèयांवर एक समाधानाचा भाव उमटला. तो वकील आणि जब्बेबाई यांच्या जगांत टोकाचा फरक होता. एका गोष्टीत साम्य होते; ती दोघंही माणसं होती. हेच सांगण्यासाठी ती येथे आली होती.
न्यायमूर्ती मोहिते आणि न्यायमूर्ती पटेल यांनी या प्रकरणात लावलेले सर्व गुन्हे रद्द केले. जब्बेबाईला दोन लाख रूपयांची नुकसानभरपाई तर या संपूर्ण प्रकरणाची सीबाआय चौकशी करण्याचे आदेश दिले. अखेर न्याय मिळाला. यात एका नावाची सर्वत्र चर्चा झाली. पारोमिता. कोण ही? या प्रश्नावर, पारोमिता गोस्वामी. नाव तसे बंगाली पण मुंबईहून आलेली आहे म्हणे. असे उत्तर मिळत होते. पुढे याच नावाने शोषित, पीडित, उपेक्षित, श्रमिकांच्या हक्कांसाठी एल्गार पुकारत शासन, प्रशासनाला हादरवून सोडलं. त्यांच्या नावाला आज कुठल्याही परिचयाची गरज नाही. मात्र, इथपर्यंतचा हा प्रवास कसा घडला, त्यांच्या जीवनातल्या न उलगडलेल्या अशा विविध पैलुंची ओळख पुढे त्यांच्याच शब्दांत होणार आहे.
----------------
बालपण आणि संस्कार
माझा जन्म तसा कोलकात्यात झाला. मात्र, बालपण इथे गेले नाही. वडील सैन्यांत असल्याने सतत दोन कींवा तीन वर्षांनी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी बदली व्हायची. जम्मू, पठाणकोट, बराकपूर, आसामसह संबंध उत्तर भारताचा अस्थिर प्रवास यातून घडला. छावनीतील वातावरण कसं शिस्तबद्ध असायचं. त्यामुळे इतर सामान्य मुलांपेक्षा येथील जग काहीसं वेगळं होतं. कदाचित नवल वाटेल पण आमचे खेळही बाहुले-बाहुल्यासारखे नव्हे तर भारत-पाकिस्तान युद्ध, स्वातंत्र्याचा लढा, बांग्लादेशची निर्मिती असे असायचे. देशभक्ती, देशसेवा, देशकर्तव्य अशाच संकल्पनांभावती आमचं जग किरायचं. सैनिकांच्या मुलांना आईच्या दूधातून देशसेवेचे बाळकडू मिळते हे मी ठामपणे सांगू शकते. एकीकडे वडील शिस्तप्रिय तर आईचे जग त्याचे दूसरे टोक होते. ती शिक्षिका होती. पुरूषाच्या चरणांत आपला स्वर्ग मानना-या अबला स्त्रीचा पिंड तिचा नव्हता. ती स्वावलंबी आणि मुक्त अशा विचारांची एक स्त्री होती. हेच बाळकडू तीने आम्हा सर्व बहिणभावंडांना दिले. अन्य स्त्रीयांप्रमाणे आईने कधीही घरकाम करायला शिकविले कींवा सांगितले नाही. त्यामुळे लहानपणीच रविद्रनाथ टागोर, बंकीमचंद्र चटोपाध्याय, शैलेश डे अशा कितीतरी नामवंत लेखकांचे साहित्य आम्ही वाचून काढले होते. स्वामी विवेकांनंद यांचे शिकागो येथील गाजलेले भाषण तर आईने मुखोदगद करायला लावले. यात भर म्हणजे सत्यजीत रे, बिमल रॉय, रित्विक घटक या सारख्या जागतिक ख्यातीच्या चित्रपटकारांची ओळखही याच वेळी आम्हाला घडली. कधीकधी तर प्रश्नच पडतो. आपले बालपण किती वेगळे होते नाही?
आईची पाश्र्वभूमीही वेगळी होती. दत्तोकेंदूआ हे तिचे जन्मगाव, जे आता बांग्लादेशमध्ये आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात या गावाचे मोठे योगदान आहे. माझी आई सांगायची, या गावात आठ वर्षापेक्षा कमी आणि ८० वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोकंच फक्त दिसायची. कारण उर्वरित सर्व मंडळी ही स्वातंत्र्य लढ्यात सामील व्हायची. अंदमान येथील सेल्यूलर जेलमध्ये असलेल्या कैद्यांच्या यादीमध्ये आजही या गावातील लोकांची नावे नमूद आहेत. माझी आजीही शिक्षिका होती. बर्धमान येथील राजाने त्यांना तिथे शाळा काढण्याकरिता खास आमंत्रण दिलं होतं. अशी जडणघडण झालेल्या आईकडून तुम्ही हीच अपेक्षा ठेवू शकता. देवदूत, राक्षसांच्या कथा तिथे कधी आम्हाला सांगितल्याचे स्मरणात नाही. तीनेही आम्हाला स्वावलंबी होण्याचेच शिकविले.
------------------
मुंबईपर्यंतचा अनपेक्षित प्रवास
आठवीपर्यंतचे माझे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले होते. मात्र, यानंतर दहावी, बारावी आणि पदवीपर्यंतचे शिक्षण मी कोलकत्यातच पूर्ण केले. या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात एक आवाज सतत मनाला अस्वस्थ करित होता तो म्हणजे 'आपल्याला काहीतरी करायचं आहे'. अनेक स्वप्न आणि अनेक पर्याय होते. मात्र, नेमकी वाट मिळत नव्हती. याच द्विधा मनस्थितीत १९९१-९२ मध्ये जाधवपूर येथे एमए करण्याकरिता प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी उत्तीर्ण झाले, दुसरे वर्ष सुरू झाले. मात्र, मनात घोंघावणा-या आवाजाचे आता एका मोठ्या वादळात रूपांतर झाले होते. याच दरम्यान मोनादीपा बॅनर्जी ही माझी जुनी मैत्रिण खूप दिवसानंतर भेटली. ती मुंबई येथील टाटा इंस्टिट्यूट ऑङ्क सोशल सायन्स (टीस्स) येथे शिकत होती. तीने मला तेथील समाजशास्त्राच्या शिक्षणाबद्दल सांगितले. समाजकार्य उत्स्फूर्त भावनेतून केलेले कार्य अशीच माझी कल्पना होती. मात्र, याचे रितसर शिक्षणही असते याचा साक्षात्कार मला पहिल्यांदाच झाला. वाटलं जणू वर्षानुवर्षे अंधारलेल्या माझ्या जगात लख्खं प्रकाश पडला. बस्स... मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मी ठरविलं, मला मुंबईला जायचं आहे. हा निर्णय घरी सांगितला. सर्वसामान्य आईवडीलांप्रमाणे त्यांनाही थोडी चिंता वाटली. मात्र, या निर्णयावर ठाम होते. १९९३ मध्ये मी टीसमध्ये पहिल्या वर्षात प्रवेश घेतला आणि मला अंर्तबाह्य बदलवून टाकणा-या शिक्षणाची सुरुवात झाली. आत्तापर्यंत समाजाचे ऋण फेडण्याच्या भावनेने केलेले कार्य, गरजुंना मदत करणे हीच समाजसेवा अशी समज होती. मात्र, ही भावना म्हणजे एखाद्या हिमनगाप्रमाणे होती. देशाची राज्यघटना, वर्गव्यवस्था, जातीप्रथा, समाजकारण, राजकारण, शोषण या सारख्या गोष्टी या समाजकार्यामागचे महत्त्वाचे घटक आहे हे याच वेळी कळले. एका सूखवस्तू घरात जन्म घेतल्यामुळे सारं काही सहज मिळत होतं. अशा व्यवस्थेचे चटके कधी मला बसलेच नव्हते. त्यामुळे या साèया गोष्टी मला अंतर्मुख करणा-या होत्या. त्यामुळे दोन वर्षांनंतर १९९५ मध्ये या इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडले ते अस्वस्थ होवूनच.
-------------------
समाजकार्याला सुरुवात
मला काहीतरी काम हवं होतं. प्रा. जानकी अंधारीया यांनी मला त्यांच्या एका प्रोजेक्टमध्ये काम करायची संधी दिली. याच दरम्यान विवेक पंडीत यांच्याशी ओळख झाली. त्यांची श्रमजीवी संघटना होती. मी त्यांच्या संघटनेत काम करायला लागले. ठाणे जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. यासोबतच विटाभट्टी, कारखाने, गिरण्यांत काम करणा-या मजूरांचेही येथे वावर होता. त्यांचे अनेक प्रश्न, समस्या होत्या. देशाची आर्थिक राजधानी, उच्चभ्रू लोकांचे विकसित शहर अशी बिरूदावली असलेल्या मुंबई शहरापासून अवघ्या ५० किलोमीटरवर हे टोकाचे विदारक वास्तव होते. येथूनच मी आपल्या प्रत्यक्ष कार्याची सुरुवात केली. मजूरांच्या मुलांचे जीवन, त्यांच्या शैक्षणिक, आरोग्याचे प्रश्न, आदिवासी समाजाची जीवनपद्धती, त्यांचे होणारे शोषण, समस्या हे सर्वकाही प्रत्यक्ष जवळून पाहायला मिळालं. फेरफार , सातबारा, खसरा या सर्वकाही प्रशासकीय बाबी काय असतात याची ओळख मला झाली. या लोकांची भाषा मला कळत नव्हंती. मात्र, त्यांची तळमळ, त्यांचे दुख:, वेदना नक्कीच माझ्यापर्यंत पोचत होत्या. माझे सहकारी मला याचा अर्थ हिंदी किंवा इंग्रजीमध्ये समजावून सांगत. हळूहळू मला मराठी भाषा समजायचा लागली ती मी थोडीफार बोलूही लागली. यामुळे संवादाचे अडथळे दूर झाले.
-----------
अन महाराष्ट्राचीच झाले
मी करीत असलेल्या कामामुळे आईवडीलांना माझी काळजी वाटायची. आपल्या मुलीने चांगल्या अशा नोकरीवर सेटल व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी ही रूखरूख बालुनही दाखविली. मात्र, जेव्हा माझं काम त्यांनी प्रत्यक्ष येवून बघितलं तेव्हा त्यांनीच संतुष्ट मनाने मला पाठिंबा दर्शविला. याच दरम्यान १९९६ मध्ये तानसा नदीवरून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पाण्याचा उपसा केला जात होता. याकरिता एक खूप मोठे रॅकेट सक्रीय होते. याला कडाडून विरोध आम्ही केला. माझ्यासह अन्य कार्यकत्र्यांवर ३०२ सारखा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण लावून धरले. राज्याचे तत्कालिन गृहमंत्री गोपिनाथ मुंडे यांनी हे प्रकरण सीआयडीकडे सोपविले. या दरम्यान या प्रकरणाच्या अनेक सुनावण्या होत होत्या. १९९९ पर्यंत मी ठाण्यातच होते. आता तिथे राहायचा मला कंटाळा आला होता. मला आणखी बरेच काही करायचे होते. मात्र, न्यायालयाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्र सोडता येत नव्हता. विवेक पंडित यांनी मला चंद्रपूर जिल्ह्यात जावून काम करायचे सुचविले. मूल तालुक्यातील बाबा वडलकोंडावार यांना जावून भेट ते तुला मदत करतील, असे त्यांनी सांगितले. मागचा पुढचा काहीही विचार न करता हातात एक बॅग आणि डोळ्यात खूपसारे स्वप्नं घेवून मी मूलकडे निघाले.
----------------
भ्रमनिरास आणि नवी उमेद
मूल येथे बाबांसोबत माझ्याच प्रमाणे खूप सारे कार्यकर्ते असतील. त्यांच्याशी गप्पा मारताना, चर्चा करताना, त्यांचे अनुभव ऐकताना आपल्याला येथील सामाजिक परिस्थीतीचा अंदाज होईल अशी आशा होती. मात्र, राज्याच्या टोकाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे आल्यावर माझा अक्षरश: भ्रमनिरास झाला. बाबांकडे कोणीच नव्हते. बोलायला. ऐकायला कोणीच नव्हते. अगदी भयान वाटायचे. पहिला आठवडा तर मी आपल्या खोलीत अक्षरश: अश्रू गाळत काढला. हुंदके थांबतच नव्हते. मी डिप्रेशनमध्ये गेले. मी बाबांना दररोज म्हणायची, कुठेतरी जावू, कुणाला तरी भेटू मला इथे मला अजिबात करमत नाही. अखेर त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि आम्ही जवळच्या गावात गेलो. तेथील लोकांशी आम्ही संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर बाबांनी तहसीलदारांशी माझी ओळख करून दिली. इथे आल्यानंतर पहिल्यांदाच मी बाहेर पडले होते. खूप बरं वाटलं. बाबांकडे मुंबईहुन चळवळीत काम करणारी एक तरूणी आल्याचे विजय सिद्धावार यांना कळाले. तोही धडपड्या. तो मला भेटायला आला. त्यांची प्रबोधन नावाची संस्था होती. बाबांनी माझी विजूभाऊंशी ओळख करून दिली. आमची छान गट्टी जमली. त्यांचे मित्र माझे मित्र झालेत. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही खांद्याला खांदा लावून कार्य करित आहोत.
---------------------
प्रकल्प सहाय्यक म्हणून सुरुवात
विजूभाऊंशी जुळल्यानंतर मला बांबू कारांगिराच्या जीवनपद्धतीबाबत माहिती झाली. हळहळू यात मी रममाण झाली. मात्र, पंधरा दिवसानंतरत गाठीशी असलेले पैसे आता संपले होते. पुढील उदनिर्वाचाही प्रश्न होताच. त्यामुळे काम मागण्याकरिता मी थेट तत्कालिन जिल्हाधिकारी कृृष्णा भोगे यांचीच भेट घेतली. टीस्स सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून पदवी, अस्खलीत इंग्रजी बोलता, लिहिता येणारी तरूणी तुम्लाला खचितंच सापडेल असे थेट मी सांगून टाकले. तेव्हा युनिसेफतर्फे नुकताच आमची शाळा हा प्रकल्प सुरू झाला होता. त्याचे प्रमुख विजय चव्हाण यांची माझी मुंबईलाच ओळख होती. त्यांनाही सांगितलं. 'दानापानी बंद है, कुछ करो'. त्यांनी माझी विनंती मान्य करित प्रकल्प सहाय्यक म्हणून काम दिले. अशाप्रकारे चंद्रपूरात माझ्या कामाची सुरुवात झाली.
-------------
वडीलांची माया
मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करणे ही माझी जबाबदारी होती. त्यामुळे कामामगारांच्या वसाहतीत माझे जाणे सुरू झाले. याच दरम्यान शहरातील झरपट नदीजवळ वेश्याववस्ती असल्याचे कळाले. तेथील वेश्यांचे देखील मूलं होती. त्यांनाही याची गरज होती. तिथे जावून काम करणे एवढे सोपे नव्हते. याकरिता अधिकाèयांचाही विरोध होता. मात्र, कलेक्टर साहेबांना माझ्या काम करण्याची माहिती होती. त्यामुळे पारोमिताला जे करायचे आहे ते करू द्या, मात्र, तिला एकटी कुठेही सोडू नका अशा स्पष्ट सुचना त्यांनी अधिका-यांना दिल्या होत्या. त्यांना माझी काळजी होती. ही माया एखाद्या वडीलाप्रमाणेच होती. या प्रयत्नांतूनच वेशावस्तीजवळ अंगणवाडी सुरू करण्यात आली.
------------
दिल्लीवारी आणि प्रशासनाची पंचाईत
याच दरम्यान एकदा कामानिमित्त दिल्ली जाणे झाले. देशामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नुकतीच स्थापना झाली होती. मी तेथील पोलिस महानिरीक्षक शंकर सेन यांना भेटले. जिथे गरीब, अशिक्षित लोकांचे व्यवस्थेकडून शोषण होते, जिथे मानवी मूल्ये पायदळी तुडविली जातात अशा ठिकाणी मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्याऐवजी दिल्ली सारख्या ठिकाणी केली जाते याबाबत मी माझी नाराजी त्यांच्यासमोर व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या विविध सामाजिक समस्यांबाबत त्यांना अवगत केले आणि चंद्रपूरात येण्याचे आमंत्रण दिले. त्यांनी लगेच मान्य केले. मात्र, मी बुचकाळ्यात पडले. आपण जोशात येवून भाषण तर झोडले आता ते येण्याचे सर्व नियोजन आपल्याला करावी लागणार यामुळे धाकधुक होत होती. चंद्रपूरला पोहचल्यानंतर ही बाब अधिकाèयांना सांगितले आणि प्रशासन हादरूनच गेले. याठी सर्व प्रशासन कामाला लागणार होते. प्रोटोकॉल पाळावा लागणार होता. माझ्या बावळटपणाचा त्यांना संताप आला असावा. शंकर सेन येथे आले. त्यांनी सर्व प्रशासनासमारे माझी मुक्तकंठाने प्रशंसा केली. तिच्यामुळेचे मी येथे आलो असल्याचे सांगितले. माझ्या धाडसी, धडपड्यावृत्तींची त्यांनी स्तूती केली. यानंतर शहरातील वकील, प्राध्यापक तसेच विविध संघटना आणि पत्रकारांकरिता त्यांनी बैठक घेतली. यामुळे शहरातील अनेक मान्यवरांशी माझी ओळखी झाली.
याच वेळी शंकर सेने यांनी माझी नियुक्ती जेल व्हीजीटर म्हणून करावे असे जिल्हाधिकारी यांना सांगितले. याकरिता कायद्याची पदवी आवश्यक असल्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला. मात्र, शंकर सेन म्हणाले, 'ही मुलगी हुशार आहे, तिला चांगली समज आहे ती हे काम चांगल्या पद्धतीने करू शकेल. पदवी महत्त्वाची नाही. जे काम ती करेल ते महत्त्वाचे.' ही सूचना मान्य झाली. तेव्हापासून माझी जेल व्हीजीटर म्हणूल कारकीर्द सुरू झाली.
-----------------
श्रमिक एल्गार संघटनेची स्थापना
चंद्रपूरा आल्याला आता काही महिने उलटले होते. निवडणूकीचा तो काळ होता. एवढ्यात सिंदेवाही तालुक्यातील चिटकी या गावात एक प्रकरण घडले. आदिवासी समाजाच्या गावडे भावंडामध्ये शेतीच्या वादातून भांडण झाले. प्रकरण पोलिसांपर्यत गेले. यात गोपाळ गावडेला अटक करण्यात आली. त्याला सोडविण्यासाठी त्याच्या बायकोला पाच हजारांची मागणी करण्यात आली. ती कुठून देणार? शुल्लक वाद असल्यामुळे गावकèयांनीही त्याला सोडविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, हाती निराशा आली. यावेळी अशोक येरमे नावाच्या युवकाला माझ्याबद्दल कुठून तरी कळले. तो माझ्याकडे गोपाळच्या अटकेची कागदपत्रेच घेवून आला. ते वाचून मला धक्काच बसला. आचारासंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्याला अटक केल्याचे दाखविले होते. बरं, हा गोपाळ निवडणूकीत उमेदवार नव्हता की कुठल्या राजकीय पक्षाशी त्याचा संबंधही नव्हता. मात्र, त्यावर तहसीलदारांनीही डोळेझाकपणे सही केली होती. निवडणुकीच्या काळात गोपाळमुळे तर काही व्यतय आला नव्हता तरीही पोलिस, प्रशासनाने हे केलं. मी कलेक्टरकडे गेले. एका निर्दोष व्यक्तीवर अशा प्रकारचा बेजबाबदार गुन्हा नोंदविल्याबाबतची सारी कैफीयत सांगितली. त्यांना ते पटलं. त्यांनी काय केले माहिती नाही मात्र, पुढील दोन दिवसांतच गोपाळ सुटला.
त्याच्यासोबत आम्हीही गावी गेलो. बस नसल्यामुळे चार किलोमीटर पायी जावं लागलं. परतीच्या वेळी संध्याकाळ झाली. दगड मातीचा रस्ता आणि भोवती घनदाट जंगल त्यामुळे तिथेच मुक्काम करण्याचं आम्ही ठरविलं. यावेळी गावात माझ्याबद्दल बरेच कुतूहल निर्माण झाले होते. ही कोण बंगाली मुलगी आपल्याला गावात आली असे म्हणून अनेकजण मला भेटायला आले. त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी आपली कैफीयत माझ्यासमोर मांडली. तलाठी पैसा खातो, फॉरेस्टवाले त्रास देतात. पोलिसही पिळवणूक करतात. महिलांनीही आपल्या समस्या मांडल्या. मी त्यांना त्यांचे हक्क, कायदा, देशाचे संविधान त्यांना पटेल त्या भाषेत समजावून सांगितले. याचवेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली. आपल्याला अशा समस्या सोडविण्यासाठी एक संघटना काढायला हवी. गावातील बायकांनीही याला पाठिंबा दिला. पुढे एकदोन बैठकी झाल्या. संघटनेचं नाव कसं तडफकदार व्हावं ही सर्वांची इच्छा होती. त्यामुळे दलित, शोषित, पीडित, कामगारांचे प्रतिनिधीत्व करणारा 'श्रमिक' हा शब्द हवाच होता. तर पुढचा शब्द 'एल्गार' ठरविला. सुरेश भटांच्या गजलाचे माझ्यावर गारूड होते. एकदा मुंबईत असताना विवेक पंडीत काहीतरी मराठीत गुणगुणत होते. मी विचारलं, हे काय?. ते म्हणाले, हे सुरेश भटांची गझल आहे. मी म्हटलं, 'छे, मराठीत कुठे आली गझल, ती उर्दूमध्ये. नाही. सुरेश भटांनी ती मराठीत आणली आहे, हे बघ, मकरू नका एवढ्यात पराभवाची, रणात आहे झुंजणारे अजुनही काही'. ही ओळ ऐकली की आजही अंगावर शहारे येतात. त्यानंतर भटांच्या गझलाची मी फॅनच झाले. त्यांच्या एल्गार या संग्रहामध्ये फार सुंदर गझल आहे. मसाध्याच माणसांचा एल्गार आहे, चोर-गांडुळांचा भोंदू जमाव नाही'. याच गझलमधून मी एल्गार वे नाव संघटनेमध्ये लावले. हे श्रेय भटांचंच.
------------------
निष्ठावंत कार्यकर्ते आणि मी
आम्ही सर्व उत्साह आणि ऊर्जेने भरलेलो होतो. त्यामुळे समाजातील छोटेछोटे प्रश्न हाती घेणे सुरू केले. चिन्ना मटानीच्या प्रकरणापूर्वी मी तुरूंगात गेले होते. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना रेशनच्या धान्याच्या कींमतीत प्रचंड वाढ झाली होती. दिवसाचे पाच ते दहा रूपये मजुरी करून कमविणाèयांना हे परवडणारं तरी कसे? या विरोधात आम्ही सिंदेवाहीच्या फाट्यावर आंदोलन केले. जवळच्या घोट-चिटकी गावातील जवळपास ८० ते ८५ महिला पुरूष यात सामील झाले होते. पोलिस आले. आम्हाला अटक केली. आम्ही ठरविले होते कुठल्याही परिस्थिती जामीन घ्यायचा नाही. आम्हाला नागपूरच्या तुरूंगात
डांबण्यात आले. अनेकांना वाटलं ही या बाईची संघटना आता संपली. मात्र, झाले यांच्या उलटंच. आम्ही आणखी स्ट्राँग होवून परतलो. सुटून आल्यानंतर गावकèयांनी आमचे जल्लोषात स्वागत केले. आमची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक कार्यकत्र्याच्या चेहèयावर एक वेगळीच चमक दिसत होती. याच विजयी जल्लोषाच्या गजरात मी आपल्यातच हरवून गेली. आपल्या यशात या खंबीर, निष्ठावंत कार्यकत्र्यांचा किती मोलाचा वाटा आहे याची जाणिव मला झाली. याच आंदोलनाचा प्रसंग डोळ्यासमोर तरळला.
आम्ही रस्त्यावर ठाण मांडले होते. जामीन घेण्याचा प्रश्नंच नव्हता. वातावरण चांगलेच तापले होते. सर्वांचा तुरूंगात जाण्याचा पहिलाच अनुभव होता. पुढे काय होणार, तुरूंगात किती दिवस काढावे लागतील याची कुणालाच माहिती नव्हती. यामध्ये चटकी गावातील एक जोडपे सामील झाले होते. ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, ममताई आम्हाला दहा मिनिटं द्या, आम्ही लगेच परत येतो". त्यांच्याकडे जाणारी दुचाकी त्यांना मिळाली होती. हे ऐकुण मी कमालीची संतापली. मी स्पष्टपणे नकार दिला. कारण एकाला पाहुनं दुसरेही अशीच सबब देणार आणि आंदोलन मोडीत निघणार. आंदोलनात सर्वांत महत्त्वाचा असतो तो दृढ संकल्प. मात्र, ते खुप गयावया करू लागले. वेळ कमी होता. मी नाईलाजाने त्यांना होकार दिला. मात्र, गुपचुप निघून जा असा सल्ला त्यांना मी दिला. त्यांनीही तसेच केले.
२० मीनिटे झाली ते परतले नाही. मलाही ते परतण्याची फारशी काही आशा नव्हतीच. मात्र, अध्र्या तासांत हे जोडपे मला परत येताना दिसले. त्या स्त्रीच्या कुशीत एक दोन वर्षांचे छोटं बाळ होतं. मी अक्षरश: निशब्द झाली. भावनेची एक मोठी उबळ अंगावरून येवून गेली. मी काही बोलण्याच्या आतच ती स्त्री माझ्याजवळ येवून म्हणाली, ममताई, हा जन्मजात आंधळा आहे. घरी आम्ही दोघंच असल्यामुळे याचा सांभाळ करणारं कुणीच नाही. आता चला कुठेही" या घटनेचा माझ्या अंतर्मनाच्या खोलवर परिणाम झाला. या सर्व कार्यकर्ते माझ्या सहकाèयांच्या विश्वासामुळंच हे सर्वकाही शक्य होवू शकले.
------------------
चिन्ना मटीनी प्रकरण
चिन्ना मटानी या गाजजेल्या प्रकरणात मला नक्षलवादी ठरविण्याचेही प्रयत्न झालेत. विवेक पंडित आणि विजय सिद्धावार यांच्या आग्रहामुळंच मी या प्रकरणात लक्षं घातलं. यादरम्यान आदिवासी समाजाचे विदारक चित्र मला पहावयाला मिळालं. चिन्नाचे सर्व सहकारी तुरंगात होते. तेव्हाची माझ्याकडं जेल व्हिजीटरचं काम होतंच. मी त्यांची भेट घेतली. त्यांची भाषा मला आणि माझी भाषा त्यांना कळत नव्हती. मेजिस्ट्रेटच्या आदेशानुसार या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू झाली. चौकशी होईपर्यत आम्ही शांत बसायचं ठरविलं. नोव्हेंबर २००१ मधे चौकशी पूर्ण झाली. यातील अहवालामध्ये लिहलं होतं, मचिन्ना नक्षलवादी नव्हता, मात्र पोलिसांचा गोळीबार समर्थनीय आहे. या परस्पर विसंगत निष्कर्षामुळे आम्ही बुचकाळ्यातच पडलो. एकतर चिन्ना नक्षलवादी होता आणि म्हणून पोलिसांचा गोळीबार समर्थनीय आहे कींवा चिन्ना नक्षलवादी नव्हता त्यामुळं पोलिसांचा गोळीबार समर्थनीय नाही, असा तो निष्कर्ष असायला हवा होता. यामुळंच आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली. यावेळी मला नक्षलवादी चळवळीच्या फ्रटल ऑर्गनायझेशनमध्ये काम करित असल्याचा आरोप वकीलाने केला. त्याकाळच्या मपोटोङ्क अटकेचा प्रयत्नही झाला. मात्र, न्यायालयाने पोलिस प्रशासनाच्या आरोपाल फटकारत अटक न करण्याचे आदेश दिले. चिन्नाच्या आईला कोर्टाची भाषा समजत नव्हती. मात्र, न्यायाधीशांनी ही अडचण समजून घेतली. न्यायमूर्ती जेव्हा बोलयाचे तेव्हा वाटायचं साक्षात या देशाचे संविधानच आपल्या समोर बोलत आहे. अखेर निकाल चिन्नाच्या बाजूलाच लागला.
--------------------------
कोलामांच्या जमीनी परत मिळाल्या
जिल्ह्यातील जिवती तालुक्यात कोलाम समाजाचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. येथील कोलामांच्या जमीनी गैरआदिवासींनी बळकावल्या होत्या. यामुळे येथील कोलामांनी जवळच्या तेलंगणा राज्यात पलायन केले होते. आम्ही या विरोधात लढा उभारला. याची दखल प्रशासनाला घ्यावी लागली. याकरिता तत्कालिन जिल्हाधिकारी संजीव जयस्वाल स्वत: येथे आले होते. त्यांनी स्वत: जमीनीचे मोजमाप करित या समाजाची इंच न इंच जमीन रीतसर त्यांच्या हवाली केली. विशेष म्हणजे या पुष्पहारांनी त्यांचे स्वागत करण्यात आले हेच पुष्पहार त्यांनी या कोलामांच्या गळ्यात टाकून त्यांचा सत्कार केला. एवढंच नाही तर ही परिस्थिती त्यांच्यावर ओढविली या प्रशासनाच्या अपयशाबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली. हे दृश्य पाहुण माझा कंठ दाटून आला. एखादा संघर्ष करताना मी कधीही भावनिक होत नाही. मात्र, एकदा का त्याचे फलित साध्य झाले की आतून प्रचंड भरून येते. पूर्वी रडायला थोडं अडखळल्यासारखं व्हायचं. आता मात्र, मी मनसोक्त रडून घेते.
------------------
चळवळ आणि कुटुंब
कुटुंब ही माझा दुखरा भाग आहे. आज पारोमिता गोस्वामी म्हणून मला समाजात, माध्यमात एक मान्यता मिळाली. ती ओळख माझ्या कुटुंबाला कधीच मिळत नाही. जेव्हा की माझ्या कुटुंबाचा त्याग, समर्पण, समजुतदारपणा, पाठिंब्याशिवाय हे शक्यच झाले नसते. मी एक मुलगी होती तेव्हा आपल्या आईवडीलांना वाट्टेल ते म्हणू शकत होती. मात्र, मी सुज्ञ असताना आपला जीवनसाथी स्वत: निवळा असताना मी ही गोष्ट आपले पती, सासू, मुलगी यांना म्हणून शकत नव्हती. एक आई, पत्नी, सून म्हणून माझीही काही जबाबदारी आहेच ना. मी आजवर जे काही केलं ते ठरवून केलं. त्यात मला आत्मीक समाधान लाभलं. मात्र, याची कींमत माझ्या कुटुंबाला मोजावी लागली. आजही ते मोजत आहेत. मुलगी तीन वर्षांची असताना मी सात दिवस तुरूंगात होती. मी उपोषणाला बसली असताना भेटण्यासाठी लोक तिला मंडपात आणायचे. महिनोमहिने दारूबंदीचे आंदोलन चालले. मी बाहेर असायची. नवèयाला याचा त्रास व्हायचा. मुलीला तो सांभाळायचा. मला आजही आठवते. माझी मुलगी टायफाईडमुळं सात दिवस रूग्णालयात भरती होती. १०६ डिग्री तापाणे ती फणफणत होती. याच वेळी नागपूर येथे डाटा एंट्री ऑपरेटर्सचे आंदोलन होते, त्याचे नेतृत्त्व मी करणार होते. मी तिच्याजवळ राहू शकत नव्हते qकवा तिला रूग्णालयातही ठेवू शकत नव्हते. डॉक्टरला सुटी मागितली आणि सासुबाईसोबत तिला मूल येथील घरी पाठविले. तिकडे राज्यातील डाटा एंट्री ऑपरेटर्सवर अन्याय झाला होता. त्यांना माझी गरज होती. मी थेट नागपूरला गेली. आजही या घटनेबद्दल विचार करते तर माझं मन सुन्न होवून जाते. एक मोठ्ठं प्रश्नार्थक चिन्ह उभं राहतं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर त्यावेळी मी केलेली कृती बरोबर की चूक याचं कुठलंही उत्तर मला मिळत नाही.
--------------------
महात्मा गांधी, सावित्रीबाई फुलेंचा प्रभाव
माझ्या जीवनामध्ये महात्मा गांधी आणि सावित्रीबार्इंचा खूप मोठा प्रभाव आहे, तो वेगेळ्या कारणामुळे. पंचवीसीतील महात्मा गांधी मला माझे मार्गदर्शक वाटतात. तेव्हा नुकतेच ते एलएलबी करून दक्षिण आक्रिकेत गेले होते. येथे त्यांनी बरेचे प्रयोग केले. ते फसलेही. मात्र, त्यांनी आपले प्रयत्न निरंतर जारी ठेवले. याचेळी वर्णभेदाच्या नावावर भेद करणाèया इंग्रज सरकारविरोधात त्यांनी एल्गार पुकारला. त्यांना मोठ्या संख्येने साथ मिळाली. मात्र, आंदोलनकत्र्यांच्या दररोजच्या गरजांचाही प्रश्न होता. याकरिता सर्वात सुरक्षित जागा म्हणजे तुरूंग. संघटना बांधणी तंत्रज्ञानाचा आविष्कार त्यांनी केला. आंदोलनकत्र्यांना सोबत घेवून त्यांनी लाँग मार्च काढला. जागतिक पटलवरचा असा अभिनव प्रयोग पहिल्यांदाच झाला होता. हे किती मोठं कौशल्य होते. मोहनदास गांधीपासून महात्मा गांधीचा प्रवास येथूनच सुरू होतो.
सावित्रीबार्इंच्या कुठल्या शब्दांत मी कौतुक करावं हेच समजत नाही. ती माझ्या खूप जवळची आहे. व्यक्तीमत्त्वाच्या अशा विविध पैलुंची व्यक्ती आजवर तरी माझ्या स्मरणात नाही. एक अशिक्षित महिला शिक्षित होते, समाजाचा तीव्र विरोध पत्करत शिक्षिका होते, केशवपणाच्या विरोधात आंदोलन करते, अनैतिक संबंधातून गर्भधारणा झालेल्या महिलांची प्रसुती करते, आपल्या पतीचय जाण्यानेही खचून न जाता आपले कार्य सुरूच ठेवते, प्लेगसारख्या महामारीत रूग्णांची सेवा ती करते आणि याच दरम्यान तीचा मृत्यू होतो. एखाद्या व्यक्तीमत्त्चाचे हे सर्व पैलू माझ्यासारख्या महिलेला थक्क करणारे वाटतात.
त्या काळातील परिस्थिती काय असेल, हा विचार जरी केला तरी आपला लढा किती सोपा आहे, हे जाणवते.
-----------
हे महाराष्ट्रातच शक्य होते
आता विचार करते तेव्हा वाटते हे सर्वकाही महाराष्ट्रात शक्य होवू शकत होते. सामाजिक चळवळीचा एक मोठा वारसा येथे लाभल आहे. महिलांविषयीचा आदर या मातीत आहे. पंचवीस वर्षांची एक बंगाली तरुणी येथे येते आणि इथला समाज मला स्वीकारतो. ही मोठी बाब आहे. विरोध मलाही झाला. मात्र, येथील विरोधात संयम आहे, माणुसकी आहे. दारूवाल्यांविराधोत मी आंदोलन केले. त्यांनी माझ्यावर हल्ला केला नाही. कदाचित हेच मी बंगालमध्ये सांगणार नाही. हेच काम बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात करण्याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे येथील मातीविषयी मला नितांत आदर आहे.
-------
मी फक्त पुढे बघते
मागील वीस वर्षांपासून मी येथे काम करित आहे. एक मोठा प्रवास यातून घडला. मात्र, याबद्दल मी ङ्कारशी काही भावनिक नाही. मागे वळून स्वत:चा वेळ घालविण्यापेक्षा आता पुढे काय हाच माझ्यासमो प्रश्न असतो. अनेक समस्या, अनेक प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी आणखी जोमाने काम करायचे आहे.
*Amit welhekar, correspondent, ETV Bharat*